मराठीतील श्रेष्ठ कथाकार आणि समर्थ अनुवादक जी. ए. कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ हे नाटक सहा दशकांनंतर वाचकांच्या भेटीला येत आहे. जीएंनी १९५३ मध्ये अनुवादित केलेले हे नाटक ही त्यांची अखेरची साहित्यकृती रविवारी (७ डिसेंबर) प्रकाशित होत आहे. एका दिवसाची, एका कुटुंबातील आणि एकाच खोलीत घडलेली कथा असे हे नाटक आहे.
‘काजळमाया’, ‘निळासावळा’, ‘हिरवे रान’ यांसारख्या स्वतंत्र प्रतिभेच्या साहित्यकृतीतून आणि गूढरम्य लेखनातून जीए यांनी कथावाङ्मयामध्ये आपली नाममुद्रा उमटविली. ‘स्वातंत्र्य आले घरा’, ‘शिवार’, ‘गाव’, यांसारख्या साहित्यकृतींनी वाचकांवर गारुड केले होते. मात्र, त्यांनी नाटक हा साहित्यप्रकार कधीही हाताळला नव्हता. ‘युजिन ओ नील’ या नाटककाराचे ‘लाँग डेज जर्नी इन टू नाईट’ हे नाटक आवडल्याने त्याचा अनुवाद करण्याचा निर्णय जीएंनी घेतला आणि हा अनुवाद लगेच पूर्णही केला. पण, हे त्यांचे पहिले आणि अखेरचे नाटक ठरले.
या नाटकाविषयी जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर म्हणाल्या,की नोबेल विजेते विल्यम गोल्िंडग यांच्यासारख्या अनेक इंग्रजी लेखकांच्या साहित्यकृती जीएंनी अनुवादित केल्या आहेत. युजिन ओ नील यांचे ‘लाँग डेज जर्नी इन टू नाईट’ या नाटकाचा अनुवाद पूर्ण झाला. त्यावर अखेरचा हात फिरवायचे काम जीएंच्या दृष्टीने बाकी होते. त्यानंतर त्यामुळे या हस्तलिखितावर ‘प्रकाशित करू नये’ अशी नोंद त्यांनी करून ठेवली होती.  हे काम जीएंच्या निधनामुळे अपुरेच राहिले. मात्र, माझ्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी हे नाटक प्रकाशित करावे, अशी इच्छा या मूळ नाटककाराने प्रदर्शित केली होती. त्यानुसार नंतर हे हस्तलिखित मी मौज प्रकाशनचे श्री. पु. भागवत यांना दाखविले. हे नाटक वाचल्यानंतर खुद्द श्रीपुंनीच आग्रह धरल्याने हे नाटक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. सु. रा. चुनेकर यांनी त्याचे संपादन केले आहे.
मौज प्रकाशनतर्फे ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ या नाटकाचे प्रकाशन रविवारी प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मौज प्रकाशनच्या संपादिका आणि प्रसिद्ध कथालेखिका मोनिका गजेंद्रगडकर उपस्थित राहणार आहेत, असेही नंदा पैठणकर यांनी सांगितले.