सर्वाचा विचार करण्याची क्षमता आणि सामथ्र्य हे केवळ हिंदूू संस्कृतीमध्येच आहे. हिंदूू धर्माने जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. त्यामुळे हिंदूू असल्याचा संकोच करण्यापेक्षाही प्रत्येकाने आपण हिंदूू असल्याचा अभिमान बाळगावा, अशी अपेक्षा वेदविज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. प. वि. वर्तक यांनी शनिवारी व्यक्त केली.
डॉ. प. वि. वर्तक सहस्रचंद्रदर्शन समारोह समितीतर्फे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते वर्तक यांचा सहस्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार करण्यात आला. योगतज्ज्ञ दादाजी वैशंपायन, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दादासाहेब बेंद्रे, ‘गप्पाष्टक’कार संजय उपाध्ये, समितीचे अजय डोंगरे आणि भालचंद्र बोकील या वेळी उपस्थित होते. ‘हिंदूुत्वभूषण डॉ. प. वि. वर्तक’ या गौरव विशेषांकाचे प्रकाशन शंकराचार्य यांच्या हस्ते या प्रसंगी झाले.
डॉ. वर्तक म्हणाले,‘हिंदूू धर्मानुसार चांगलेपणाने वागत राहिलो त्याची जीवनामध्ये चांगली फळे मिळाली. दुसऱ्याने आपल्याशी चांगले वागावे अशी अपेक्षा ठेवताना आपणही त्याच्याशी चांगले वागणे हा धर्म आहे. आम्ही हिंदूू आहोत असे सांगण्याचा संकोच केला जात आहे. मात्र, हिंदूू धर्माने जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. अन्य धर्मीयांप्रमाणे विवाह हा करार नाही, तर देवाब्राह्मणाच्या साक्षीने करावयाचा संस्कार आहे. त्यामुळे आपल्याकडे घटस्फोटाचे प्रमाण हे पाश्चात्त्य राष्ट्रांच्या तुलनेत कमी आहे.
शंकराचार्य म्हणाले,‘ ‘ब्रह्मर्षी’ ही उपाधी संपादन करण्यासाठी तप करूनही केवळ क्रोधामुळे विश्वामित्राला ही उपाधी मिळू शकली नाही. अभ्यास आणि संशोधनाबरोबरच संयम या गुणामुळे डॉ. वर्तक ब्रह्मर्षी झाले. आपला हिंदूू धर्म परिपूर्ण आहे. त्यामध्ये दोष काढता येत नाहीत, किंवा धर्मामध्ये फेरविचार करण्याचीही आवश्यकता नाही. आपले १६ संस्कार हे वेदांचे परिपूर्णत्व दाखविणारे आहेत. त्यामुळे धर्माची कास धरून आणि परंपरांचे जतन करूनच आचरण केले पाहिजे.’
अॅड. बेंद्रे म्हणाले,‘कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास हा वर्तक यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच त्यांनी वैद्यक, आध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात अविस्मरणीय कार्य केले.’ अजय डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.