हेमलकसा या दुर्गम भागात समाजसेवेच्या विश्वामध्ये रममाण झालेल्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाने वाचनाच्या ‘प्रकाशवाटा’ उजळल्या आहेत. हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटामुळे पुस्तकाच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे पुस्तक चार वर्षांपूर्वी वाचकांना उपलब्ध झाल्यापासून आतापर्यंत ६० हजार पुस्तकांची विक्री झाली आहे. त्यापैकी २० हजार प्रती या चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तीन आठवडय़ांमध्येच गेल्या आहेत.
हेमलकसा भागामध्ये काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारित डॉ. प्रकाश आमटे यांनी आत्मकथनपर पुस्तकाचे लेखन केले आहे. समकालीन प्रकाशनतर्फे २००९ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकावरच हा चित्रपट बेतलेला आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या समृद्धी पोरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नाना पाटेकर यांनी डॉ. प्रकाश आमटे यांची, तर सोनाली कुलकर्णी यांनी डॉ. मंदा आमटे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पुस्तकाच्या वाचनाची ओढ निर्माण झाली असून त्यामुळे पुस्तकविक्रीमध्ये वाढ झाली आहे. या पुस्तकाची सध्या २७ वी आवृत्ती संपत आली असून २८वी आवृत्ती बाजारामध्ये येत आहे.
‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर म्हणाले, ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाला आधीपासूनच मागणी होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हे पुस्तक पुन्हा एकदा प्रकाशझोतामध्ये असून आतापर्यंत पाचशेहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. ग्राहकांकडून एकापेक्षा अधिक संख्येने प्रती घेतल्या जात असून, साधारणपणे भेट देण्यासाठीही हे पुस्तक खरेदी केले जात असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवते. एखाद्या साहित्यकृतीवर चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर संबंधित पुस्तकाची मागणी वाढते. यापूर्वी ‘नटरंग’, ‘शाळा’, ‘दुनियादारी’ आणि ‘७२ मैल’ हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या पुस्तकांचा खप वाढला होता.
‘साहित्य दरबार’तर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ‘शब्दनाद’ पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अडीचशे पुस्तकांची विक्री झाली असल्याचे विनायक धारणे यांनी सांगितले.
आमटे परिवाराच्या पुस्तकांना मागणी
‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाबरोबरच संपूर्ण आमटे परिवाराच्या कार्यासंबंधी प्रकाशित झालेल्या पुस्तकांना मागणी वाढत आहे. यामध्ये भ. ग. बापट यांच्या ‘बाबा आमटे’, साधना आमटे यांच्या ‘समीधा’, विलास मनोहर यांच्या ‘नेगल : हेमलकसाचे सांगाती’ आणि ‘मला न कळलेले बाबा’, डॉ. धैर्यशील शिरोळे यांच्या ‘भगीरथ बाबा आमटे’ यासह ‘रानमित्र डॉ. प्रकाश आमटे’ या पुस्तकांचा समावेश असल्याची माहिती रमेश राठिवडेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr prakash amte prakashvata book
First published on: 06-11-2014 at 03:20 IST