आपल्या गायकीने अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी गाजविणारे स्वरराज छोटा गंधर्व हे त्यांच्या दातृत्वासाठी सर्वपरिचित होते, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. एस. एन. कात्रे यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित विशेष संगीत सभेत कात्रे बोलत होते. छोटा गंधर्व यांच्या कन्या सुलभा सौदागर, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे छोटा गंधर्व. आपल्या स्वरसाजाने रंगभूमी गाजविलेल्या या गायकाने पशुपतिनाथ मंदिरामध्ये रुद्रपठण केल्यानंतर तेथील पंडिताने रुद्राक्षाची माळ घालून त्यांचा यथोचित सत्कार केला होता, असे सांगत डॉ. एस. एन. कात्रे यांनी छोटा गंधर्व यांच्या आठवणी जागविल्या.
‘नाटय़बहार’ या संगीत मैफलीने छोटा गंधर्व यांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. बकुळ पंडित, सुलभा सौदागर, सुरेश साखवळकर, रवींद्र कुलकर्णी आणि कृष्णा जोशी यांनी ‘चंद्रिका ही जणू’ ‘जीवन ममत्व छाया’ आणि ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया’ या लोकप्रिय गीतांसह छोटा गंधर्व यांची नाटय़पदे सादर केली. त्यांना संजय गोगटे यांनी ऑर्गनची आणि साई बँकर यांनी तबल्याची साथसंगत केली. सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक केले. नाना कुलकर्णी यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले. अवंती बायस यांनी आभार मानले.