संगीत रंगभूमीवरील विविध नाटकांतून छोटय़ा भूमिकेमध्येही आपल्या अभिनयाचे रंग भरणाऱ्या आणि ‘तो मी नव्हेच’ नाटकातील ‘चन्नाक्का’ ही कानडी ढंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री उषा सुधाकर पाटणकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
मराठी रंगभूमी, भरत नाटय़ संशोधन मंदिर या संस्थांची निर्मिती असलेल्या विविध संगीत नाटकांतून उषा पाटणकर यांनी काम केले. ‘सखा माझा मंत्री झाला’ या लोकनाटय़ासह पथनाटय़े, तंबूतील नाटकांमध्येही त्यांनी भूमिका रंगविल्या. संपूर्ण नाटक पाठ असल्यामुळे ऐन वेळी कोणताही व्यक्तिरेखा त्या सहजगत्या साकारत. सुगरण असलेल्या उषाताई या मुंबईतील कलाकारांसाठी घरातून डबा घेऊन जात असत. गणेशोत्सवातील जिवंत देखाव्यांमध्येही त्या काम करायच्या. वयोमानानुसार नाटकांतून काम करणे कमी केल्यानंतर त्या भजनी मंडळातील महिलांना टाळवादन शिकवीत असत.