ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांनी रंगविलेली ‘खाँसाहेब’ ही व्यक्तिरेखा, प्रतिभासंपन्न गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत, पुरुषोत्तम दारव्हेकरमास्तर यांच्या दिग्दर्शनाचा परीसस्पर्श अशा त्रिवेणी संगमातून अर्धशतकापूर्वी संगीत रंगभूमीवर अवतरलेले आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारे ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक आता चित्रपट रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते सोमवारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणले. नाटकाच्या दिग्दर्शनासह ‘कविराज’ ही व्यक्तिरेखा साकारणारा सुबोध भावे या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहे. रसिकांच्या ओठावर असलेली या नाटकातील पदे चित्रपटामध्ये समाविष्ट करण्यात आली असून शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, महेश काळे, सावनी शेंडे-साठय़े यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध करण्यात येणार आहेत. सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असून ‘खाँसाहेब’ ही व्यक्तिरेखा पडद्यावर कोण साकारणार हे मात्र, गुलदस्त्यामध्येच आहे. सुधीर पळसाने छायांकनाची जबाबदारी पार पाडणार असून विक्रम गायकवाड रंगभूषा सांभाळणार आहेत. या मुहूर्ताच्या प्रसंगी पं. अभिषेकी यांच्या पत्नी विद्याताई अभिषेकी, पुत्र शौनक अभिषेकी, पटकथालेखक प्रकाश कपाडिया, ओम राऊत उपस्थित होते.