तापमान ११.४ अंशांवर; आणखी कमी होण्याचा अंदाज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाहत असतानाच कोरडे आणि निरभ्र असे थंडीला पोषक हवामान निर्माण झाले असल्याने सध्या पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. कपाटातील उबदार कपडे बाहेर काढावे लागले आहेत. त्याचप्रमाणे नव्याने खरेदीही करण्यात येत आहे. काही ठिकाणी रात्री शेकोटय़ा पेटविल्या जात असल्याचेही चित्र आहे. शहराचे किमान तापमान बुधवारी ११.४ अंशांवर आले. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच किमान तापमानात घट होऊन शहरात काहीशी थंडी अवतरली होती. निरभ्र स्थितीमुळे थंडीत वाढ होत असतानाच कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शहरातही ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यामुळे १३ ते १५ अंशांवर असलेले शहरातील किमान तापमान थेट २० अंशांच्या वर गेले. त्यामुळे थंडी गायब झाली. मागील आठवडय़ापासून ढगाळ स्थिती दूर होऊन आकाश निरभ्र झाले. त्यामुळे तापमानाच चढ-उतार होत राहिले, पण किमान तामपान सरासरीपेक्षा कमी राहिल्याने शहरात पुन्हा थंडी अवतरली.

सद्य:स्थितीत उत्तरेकडील राज्यांमध्ये चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. तेथून राज्याच्या दिशेने थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत. या वाऱ्यांचा प्रभाव सध्या वाढला आहे. परिणामी मराठवाडा आणि विदर्भात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी किमान तापमानात घट नोंदविली जात आहे. पुण्यातही रोजच किमान तापमानामध्ये घट नोंदविली जात आहे. मागील तीन दिवसांपासून शहरात दररोज या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून शहर आणि परिसरामध्ये गारठा वाढ आहे.

निरभ्र स्थितीमुळे शहराच्या तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. तापमान आणखी दोन-तीन अंशांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, ते एकदम मोठय़ा प्रमाणावर कमी न होता हळूहळू होईल, अशी सध्याची स्थिती आहे. काहीशी घट झाल्यानंतर तापमान स्थिर होईल.

– रविकुमार, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the cold winter of the north the people of pune cold
First published on: 29-11-2018 at 02:28 IST