घरगुती गणपतीच्या पर्यावरणपूरक आराशीसाठी काय-काय वापरले जाऊ शकते?..‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धे’तील स्पर्धकांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी नुसते रद्दी कागद आणि पुठ्ठेच नव्हेत, तर चिंध्यांपासून भरजरी साडय़ांपर्यंत आणि वाळलेली पाने व काटक्यांपासून शाडूमातीच्या स्वत: बनवलेल्या चित्रांपर्यंतचे नानाविध प्रकारचे साहित्य वापरले.
‘एमपीसीबी’सह ‘सॅन्सुई’, ‘जनकल्याण सहकारी बँक’ आणि ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे सहकार्य ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेस लाभले होते. पुणे विभागात या स्पर्धेत १५४ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातून सचिन थोरात यांनी ९,९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक व अनिल आदुडे यांनी ६,६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकावले. याशिवाय आठ स्पर्धकांना २,००१ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. अक्षय वाली, अमित वायाळ, संजीवनी खडतरे, दीपक शेळके, अनिल टिळेकर, आकाश काळे, संगीता डुंबरे व मोनिका महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, वितरण विभागाचे महाव्यवस्थापक मिलिंद प्रभुघाटे, जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक सारंग पाटील या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ चित्रकार रविराज गंधे, पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
प्रथम क्रमांकाचे विजेते थोरात म्हणाले, ‘आम्ही दुष्काळी गाव आणि हिवरेबाजार या दोन गावांमधील फरक गणपतीच्या सजावटीत दाखवला होता. त्यासाठी प्रत्यक्ष माती वापरून टेबलावर गव्हाचे शेत केले, विहीर दाखवली, तसेच दुष्काळी गावातील दृश्यात झाडाच्या वाळलेल्या काटक्यांचा वापर केला.’ द्वितीय क्रमांक पटकावणारे परळी-वैजनाथचे अनिल आदुडे यांनी कागदाच्या लगद्यापासून गणपतीची मूर्ती स्वत: बनवली. त्यांनीही दुष्काळ निवारणाबद्दल जनजागृतीची संकल्पना देखाव्यात उभी केली.
टिळेकर यांनी सजावटीत पंढरीच्या वारीचा सोहळा दाखवला. त्यांनी या वारीतील वारक ऱ्यांच्या लहान मूर्ती स्वत: घरी शाडूमातीपासून बनवल्या. शेळके यांनी फुला-पानांची आरास कागदातून बनवली, तर वाली यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजलीरूपी कागद-पुठ्ठय़ाच्या मिसाइलची आरास केली. काळे यांनी पुठ्ठा आणि रंगीत कागद वापरून चीनमधील ‘टेम्पल ऑफ हेवन्स’ मंदिराची घडी करण्याजोगी प्रतिकृती घरी बनवली. खडतरे यांनीही शाडू व कापूस वापरून गणपतीची मूर्ती घरीच बनवली आणि तिला नैसर्गिक रंगांनी सजवले, शिवाय त्यांनी घरातल्याच साडय़ांसारख्या वस्तू वापरून कोणताही नवा खर्च न करता आरास केली. महाजन यांनी टिश्यू पेपर, पुठ्ठा कागद आणि चिंध्या वापरून बॅले नर्तिकांच्या नृत्याची फिरती सजावट केली. तर डुंबरे यांनी शेत, शेततळे, ग्रामीण भागातील जीवनाचे चित्रण दाखवून शेतक ऱ्यांच्या समस्या सजावटीतून मांडल्या.

स्पर्धकांनी आपली मनोगते व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केलेच, शिवाय ‘लोकसत्ता’बद्दलचा जिव्हाळाही व्यक्त केला. सोलापूरच्या संजीवनी खडतरे म्हणाल्या, ‘गेल्या दहा वर्षांचे ‘लोकसत्ता’चे अग्रलेख आम्ही जपून ठेवले आहेत आणि त्याच्या फाइल्स केल्या आहेत. रोज सकाळी अग्रलेखावर घरात चर्चा होतेच. इंग्रजी आणि हिंदी भाषांच्या अडचणीचा मला आधी न्यूनगंड होता. परंतु आज मी लोकांसमोर माझे विचार व्यक्त करू शकते. ‘लोकसत्ता’ने मला प्रपंचातही सारासार विचार करण्याची सवय लावली.’