“पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा…”, एकनाथ शिंदे यांचं भाजपा प्रभारींना प्रत्युत्तर!

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हटले. यावर आता राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हटले. यावर आता राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने कोविडचे योग्य नियोजन केले. त्याचे सर्वोच्च न्यायालयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केलं, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “कोविडचं संकट आलं केवळ राज्यावर किंवा देशावर नाही, तर जगावर आलंय. महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडचं योग्य नियोजन केलं. त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयानं केलं आणि पंतप्रधान मोदींनी देखील कौतुक केलं. एकीकडे कोविडचं संकट, दुसरीकडे अतिवृष्टी, तिसरीकडे निसर्ग चक्री वादळ ही संकटं आली. अशा परिस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. दोन्ही वेळी १०-१० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देऊन मदत केली. अशा परिस्थितीत देखील विकास कामांना कुठेही कात्री लावली नाही. त्यामुळे सरकार उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतंय हे चित्र स्पष्ट आहे.”

“आम्ही या आरोपांकडे लक्ष देत नाही”

“भाजपाचे आरोप नवे नाहीत. जेव्हापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून भाजपाचे आरोप सुरू आहेत. परंतु आम्ही या आरोपांकडे लक्ष न देता राज्य सरकार कोविडच्या संकटाचा सामना करत आहे. तसेच विकास कामं करत आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदतही केली,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

“बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं”

बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची पुण्यात भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “सोमवारी (१५ नोव्हेंबर) बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं ही घटना दुःखद आहे. संपूर्ण आयुष्य बाबासाहेब यांनी छत्रपती शिवाजीराजे यांच्यासाठी घालवलं. त्यांनी शिवरायांचं चरित्र घराघरात पोहचवलं. जाणता राजा सारखं महानाट्य उभं केलं, जगभर पोहचवलं. शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं. आपण अशा महान व्यक्तीला मुकलो आहे. शिवसृष्टीचा त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.”

हेही वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत!

“महापालिका निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग रचनेचाच निर्णय”

“राज्य सरकारने महापालिका निवडणुकीत तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतलाय. मागील १० वर्षात लोकसंख्या वाढली. त्यानुसार नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे त्या त्या भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देणं सोपं होईल म्हणून हा निर्णय घेतला आहे. हा राज्य सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे निश्चितच नगरसेविकांची संख्या वाढली आहे,” असंही एकनाश शिंदे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eknath shinde answer allegation of bjp incharge c t ravi in pune pbs

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या