लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीसाठी पावले उचलली असून लोकसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसची पहिली बैठक रविवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी बोलावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या महिनाअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लागण्याची शक्यता असून तशी चर्चा राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. ही शक्यता विचारात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीची तयारी या विषयावर रविवारी काँग्रेसची बैठक होत आहे. ही बैठक पर्वती विधानसभा मतदारसंघाची असून बैठक पार पडल्यानंतर लगेचच अन्य विधानसभा मतदारसंघांच्या बैठकाही आयोजित केल्या जाणार आहेत. सौभाग्य मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला प्रदेश पदाधिकारी व कोणी मंत्री उपस्थित राहणार असल्याचे तूर्त सांगितले जात नसले, तरी एक-दोन मंत्र्यांची उपस्थिती या बैठकीत असेल, अशीही शक्यता आहे.
या बैठकीला पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, नगरसेवक व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे नियोजन बैठकीत केले जाणार असल्याचा निरोप अपेक्षित पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. काँग्रेसकडून लढण्यासाठी पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठा संभ्रम पक्षातच आहे. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही अद्याप निश्चित दिशा मिळालेली नाही. मात्र, लोकसभा तयारी या विषयावर बैठक बोलावण्यात आल्यामुळे तसेच एकेका कार्यकर्त्यांला बैठकीला उपस्थित राहण्यासाठीचे निरोप चार-चार, पाच-पाच वेळा दिले जात असल्यामुळे या बैठकीचे महत्त्व वाढले आहे.