श्रीमंत महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पक्षाच्या कार्यालयांमध्ये प्रचारासाठीच्या नियोजनासाठी धावपळ सुरू असून, नियंत्रणासाठी विविध समित्या स्थापन करून प्रत्येक समितीकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. प्रचार साहित्य वाटपापासून ते प्रचार सभेचे नियोजन करण्यापर्यंतच्या कामात पक्ष कार्यालयातील कर्मचारी गुंतले असून निवडणुकीचे काम त्यांच्याकडून जोरात सुरू आहे.

महापलिकेची निवडणूक तीन आठवडय़ांवर येऊन ठेपल्यामुळे पिंपरीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पक्ष कार्यालयांमध्ये विविध कामांच्या नियोजनाची लगीनघाई जोरात सुरू आहे. आकुर्डी येथील शिवसेना भवनातून शिवसेनेचे कामकाज सुरू असून कार्यालयीन सचिव ज्ञानेश्वर शिंदे पक्षाच्या कार्यालयातील कामकाज बघत आहेत. आकुर्डीतील शिवसेना भवनातच निवडणुकीच्या कामकाजासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. या वॉर रूममधून निवडणुकीचे सर्व कामकाज सुरू आहे. शिवसेनेने प्रचार, प्रसिद्धी, सभा परवाना, प्रचार साहित्य नियोजन, रॅली, पथनाटय़ आदींसाठी वेगवेगळय़ा समित्या तयार केल्या असून त्या सर्व समित्यांना कामे वाटून देण्यात आली आहेत. प्रभाग समिती आणि गटप्रमुख समित्यांशी संपर्क साधून निवडणुकीचे नियोजन केले जात आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खराळवाडी येथील राष्ट्रवादी भवनामध्येही निवडणुकीची तयारी सुरू आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने म्हणावे तसे नियोजन केल्याचे मात्र दिसून येत नाही.

निवडणुका कशा लढवाव्यात याचे तंत्र माहिती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये इच्छुकांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. अर्ज कसा भरावा, अर्जाबरोबर कोणते ना हरकत प्रमाणपत्र जोडावे, ते कोठे मिळेल, प्रचारसाहित्याचे वाटप, निवडणूक अधिकाऱ्यांची कार्यालये आदींची माहिती पक्षाच्या कार्यालयामधून देण्यात येत आहे. पक्षाचे कार्यालयीन सचिव रामदास मोरे पक्षाच्या कार्यालयाची जबाबदारी संभाळत आहेत.

काँग्रेसच्या चिंचवड गावातील काँग्रेस भवनातून पक्षाच्या निवडणुकीचीत्रे हलत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना साहाय्य करण्यासाठी स्वतंत्र गट तयार केला आहे. ज्या उमेदवारांकडे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा नाही त्यांना सर्व सहकार्य करण्याचे काम हा गट करत आहे. समाजमाध्यमे, कार्यअहवाल, बैठका, प्रचार याचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आले आहेत. नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल आदी पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक कार्यालयामध्ये नियोजन करीत आहेत.

पक्ष कार्यालयांमध्ये..

* ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मार्गदर्शन

* पक्षाच्या बैठका, प्रचार यांचे नियोजन

* सभांचे परवाने, रॅली, पथनाटय़ यांचे नियोजन