पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मतदानाचा पहिलाच बंदोबस्त करताना वेगवेगळे अनुभव आले. ही जबाबदारी समर्थपणे पेलल्यामुळे कामाचे सार्थक झाल्याची भावना अशा अनेकांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या बंदोबस्तातून छोटय़ा-छोटय़ा गोष्टी पाहायला मिळाल्या असून त्याचा नोकरीच्या पुढील काळात फायदा होणार असल्याचेही या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस दलात गेल्या वर्षभरात नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी निवडणुकीचा हा पहिलाच अनुभव होता. अनेकांना निवडणुकीच्या बंदोबस्तातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. फरासखाना पोलीस ठाण्यातील हद्दीत बंदोबस्तावर असणारे डेक्कनचे पोलीस फौजदार म्हणाले की, निवडणुकीचा हा पहिलाच बंदोबस्त असल्यामुळे सुरूवातीला काहीच समजत नव्हते. त्या वेळी सोबत असलेल्या ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी काय काळजी घ्यावी, हे या वेळी समजले. इतर बंदोबस्तापेक्षा निवडणुकीचा बंदोबस्त हा वेगळा असल्याचे जाणवले. दोन्ही बाजूच्या राजकीय पक्षांचे आपल्या कामावर लक्ष असते. त्यामुळे काळजीपूर्वक काम करणे आणि नागरिकांना भीती न वाटता मतदान करता यावे ही जबाबदारी पोलिसांची असते. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते.
मुंबईहून पुणे ग्रामीणमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले की, दहा मतदान केंद्रांची जबाबदारी देण्यात आली होती. तिथे काम करताना नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी कधी प्रेमाने, तर कधी कायदेशीर भाषा वापरावी लागली. इतर बंदोबस्तापेक्षा निवडणुकीचा बंदोबस्त करताना एक वेगळाच दबाव असतो याची जाणीव झाली. शहरातील जनतेपेक्षा ग्रामीण जनतेमध्ये कायद्याबाबत जागृती नसल्याचे दिसून आले.
सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले की, गेल्या ४८ तासांपासून मतदान केंद्रावर बंदोबस्त सुरू आहे. निवडणुकीचा हा पहिलाच बंदोबस्त होता. एका मतदान केंद्राची जबाबदारी दिल्यामुळे त्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी शिस्त आणि कायद्याचे काटेकोर पालन करून काम करण्यावर भर दिला. यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांची चांगली मदत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election redress experience police
First published on: 18-04-2014 at 03:25 IST