मावळच्या बहुचर्चित रणधुमाळीत सातारकरांचे महत्त्व चांगलेच वाढले आहे. सातारकरांचे जावई असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर तसेच मनसे-शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात एकगठ्ठा सातारी मते स्वत:कडे खेचण्यासाठी भलतीच चढाओढ लागली आहे. महायुतीने देखील श्रीरंग बारणे यांच्यासाठी ‘सातारा कनेक्शन’ शोधून त्यावर काम सुरू केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
नोकरी तसेच कामाधंद्यानिमित्त साताऱ्यातून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या रहिवाशांची संख्या मोठी आहे. मावळच्या अटीतटीच्या लढाईत एकेक मत महत्त्वाचे मानून उमेदवारांची मतांची बेगमी सुरू आहे. त्यामुळे साताऱ्याच्या एकगठ्ठा मतांना कमालीचे महत्त्व आले आहे. माजी मंत्री फलटणचे रामराजे निंबाळकर यांचे नार्वेकर जावई आहेत. ते आपल्या भाषणात ‘मी रायगडचा सुपुत्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जावई आहे’ या वाक्याचा आवर्जून उल्लेख करतात. लक्ष्मण जगताप हेदेखील कराड तालुक्यातील सुपणे येथील जाधव घराण्याचे जावई आहेत. ‘जावई माझा भला’ म्हणत दोन्ही घराण्यातील पै-पाहुण्यांमध्ये प्रचारात चढाओढ दिसून येते.
सातारा जिल्ह्य़ातील भुईंजजवळील गजानन बाबर यांना आतापर्यंतच्या प्रवासात सातारी मतांचा मोठा वाटा मिळत राहिला. त्यामुळे हा वर्ग शिवसेनेकडे झुकल्याचे चित्र होते. आता बाबर मनसेत गेले आहेत. मात्र, त्यांचे बंधू मधुकर बाबर शिवसेनेतच आहेत. खासदार बाबर हे जगतापांच्या ‘कपबशी’साठी, तर मधुकर बाबर हे बारणेंच्या ‘धनुष्यबाणा’साठी या मतांची बांधणी करत आहेत. रामराजे तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने सातारी मते आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीची उमेदवारी आझम पानसरे यांना होती. त्यांच्या प्रचारासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचारासाठी आणण्यात आले होते, त्यामागे सातारकरांचा कौल मिळवण्याचेच नियोजन होते. आताच्या रणधुमाळीत सातारकरांचा कौल कोणा एका जावयाकडे राहणार, शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणार की त्यांची विभागणी होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.