देशभरात गेले वर्षभर असणाऱ्या निवडणुकांचा माहोल आता निवळू लागलेला असतानाच.. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र आता निवडणुकांचे वातावरण रंगू लागले आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका जून २०१५ पासून सुरू होत असल्यामुळे ‘कामे’ उरकण्याची गडबड सुरू झाली आहे.
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांची मुदत पुढील वर्षी संपत आहे. त्यानुसार जून २०१५ पासून अधिकार मंडळाच्या निवडणुका सुरू होत आहेत. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्ष हे नवे अधिष्ठाता, नवी अधिसभा, व्यवस्थापन परिषद यांच्यासह सुरू होणार आहे. विद्यापीठात मात्र आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. आपल्या संघटनांची बांधणी करणे, नवे सदस्य मिळवणे अशी तयारी शिक्षक, कर्मचारी यांची सुरू आहे. कुणाला आपल्याकडे वळवता येईल, कोणत्या अधिकाऱ्यांची मदत घेता येईल, यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांच्या संघटनांमध्येही संधी मिळण्यासाठी चलबिचल सुरू आहे. ज्यांना गेल्या निवडणुकीला अधिकार मंडळात संधी मिळाली नव्हती, त्यांनीही या वेळच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीला असलेल्या गटांबरोबरच एखादा नवा गटही या रिंगणात उतरण्याची चर्चा या वेळी सुरू आहे.
विद्यापीठाच्या बाहेर आणि महाविद्यालयांमध्ये हे वातावरण रंगू लागलेले असताना सदस्यांची मात्र राहिलेली ‘कामे’ उरकण्याची गडबडही सुरू झाली आहे. आपल्या गटातील महाविद्यालयांची कामे, त्याबाबतचे निर्णय, चौकशी पुढे सरकवल्या जात आहेत. मुदत संपेपर्यत सदस्यांसबंधीचे वादग्रस्त विषय समोर येऊ नयेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कंत्राटे, विद्यापीठाची कामे आपल्या ओळखीत असावीत, यासाठी आताचा काळ शेवटची संधी ठरू शकतो हे जाणून सदस्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अनेक कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचीही गडबड सुरू झाली आहे. राहिलेल्या अवघ्या चार ते पाच महिन्यांच्या मुदतीसाठीही रिक्त पदांवर आपलेच सदस्य असावेत, यासाठीही संघटनांचा प्रयत्न सुरू आहे.
विद्यापीठाकडून जानेवारीपासून शिक्षक, कर्मचाऱ्यांची नोंदणी आणि निवडणुकांची कामे सुरू होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही आता येऊ घातलेल्या निवडणुकांच्या चर्चा आणि तयारी रंगू लागली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2014 रोजी प्रकाशित
आली आली नवी निवडणूक..
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका जून २०१५ पासून सुरू होत असल्यामुळे ‘कामे’ उरकण्याची गडबड सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांची मुदत पुढील वर्षी संपत आहे.
First published on: 21-11-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elections in pune university