वीज यंत्रणेला लागलेली वीजचोरी व अनधिकृत वीजवापराची कीड दूर करण्याच्या उद्देशाने महावितरण कंपनीची दक्षता व सुरक्षा विभागाच्या रूपाने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून, या यंत्रणेने यंदा वीजचोरांना चांगलाच दणका दिला आहे. पुणे परिक्षेत्रामध्ये या यंत्रणेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये वर्षभरात सहा हजार ४०१ वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्या माध्यमातून वीजचोरांकडून तब्बल ६० कोटींची वसुली करण्यात आली आहे.
वीजपुरवठय़ाच्या यंत्रणेत सुधारणा करण्याबरोबरच चोरी व अनधिकृत वीजवापराच्या माध्यमातून होणारी विजेची हानी कमी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून दक्षता व सुरक्षा विभागाच्या वतीने पुणे परिक्षेत्रात येणाऱ्या १३ जिल्ह्य़ांसाठी स्वतंत्र १६ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीबरोबरच संशयित ग्राहकांच्या यंत्रणेची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाते. त्यातून थेट वीजचोरी त्याचप्रमाणे विजेचा वापर बदलून अनधिकृतपणे वीजवापर केल्याची प्रकरणे समोर येतात. संबंधित ग्राहकांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे दंड व व्याजाची आकारणी करून वीजबिल दिले जाते.
पुणे परिक्षेत्रात जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये महावितरण कंपनीचे संचालक व अप्पर पोलीस महासंचालक एस. पी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने १४ हजार ९४४ वीज संचांची तपासणी केली. त्यात ६,४०१ प्रकरणांमध्ये वीजचोरी व अनधिकृत वीजवापर उघड झाला. त्यातील ४,०४७ प्रकरणांमध्ये ४.१८ कोटींची थेट वीजचोरी झाली होती, तर २,३५७ प्रकरणांमध्ये ५८.२० कोटी रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर झाला होता. सर्व ग्राहकांना दंड व व्याजासह ६२.३८ कोटी रुपयांच्या वीजबिलांची आकारणी करण्यात आली. त्यातील सुमारे ६० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.
वीजचोरीची माहिती कळवा
वीजचोरी व अनधिकृत वीजवापर शोधण्याच्या दृष्टीने दक्षता व सुरक्षा विभागाची १६ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. असा प्रकार आढळून आल्यास त्याची माहिती लेखी किंवा दूरध्वनीवर द्यावी. ०२०-२६०५६१७० किंवा २६०५०४३५ या दूरध्वनीवर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक शिवाजी इंदलकर यांनी केले आहे.
मीटरमधील फेरफारीची माहिती मिळणार
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या मीटरचे वाचन स्वयंचलित करण्याची प्रक्रिया महावितरण कंपनीने टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून एकाच ठिकाणाहून ठराविक विभागातील मीटरचे वाचन शक्य होणार आहे. मीटर वाचनाबरोबरच मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या संशयित ग्राहकांची माहितीही उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिवाजी इंदलकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity theft in pune area
First published on: 29-01-2015 at 02:48 IST