प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर शहरातील तब्बल ३६ हजारांहून अधिक रिक्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लागले आहेत. रिक्षांना हे मीटर लावण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत मंगळवारी संपणार असून, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटर नसणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनी दिली.
मोटार वाहन कायद्यानुसार राज्यातील सर्व रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात टप्प्याटप्पाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नोंदणीसाठी येणाऱ्या नव्या रिक्षांना मार्च २०१२ पासून इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचा करण्यात आला. त्यानंतर १ मे २०१२ नंतर जुन्या रिक्षांचे इलेक्ट्रॉनिक मीटरशिवाय नूतनीकरण न करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या इलेक्ट्रॉनिक मीटर असल्याशिवाय कोणत्याही रिक्षाच्या परवान्याचे नूतनीकरण केले जात नाही. इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविणाऱ्या रिक्षांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर हे मीटर बसवून रिक्षांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याचे प्रमाण वाढले.
याबाबत येवला म्हणाले,‘‘इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची मुदत ३० एप्रिलला संपणार आहे. सध्या हे मीटर बसविण्यासाठी रिक्षा चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शहरात सध्या ३६ हजारांहून अधिक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लागले आहेत. अंतिम मुदतीपर्यंत आणखी रिक्षांना हे मीटर लावले जातील. सुमारे तीन हजार रिक्षा इलेक्ट्रॉनिक मीटरशिवाय असतील, अशी शक्यता आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर कठोर कारवाई सुरू होणार आहे. दोन हजार रुपये दंड व परवाना निलंबनाच्या कारवाईचा त्यात समावेश आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2013 रोजी प्रकाशित
शहरातील ३६ हजारांहून अधिक रिक्षांत लागले इलेक्ट्रॉनिक मीटर
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर शहरातील तब्बल ३६ हजारांहून अधिक रिक्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लागले आहेत.

First published on: 30-04-2013 at 06:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electronic metre for 36000 auto action on without elect metre from tomorrow onwards