पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट फॅार ऑल चॅलेंज स्पर्धेचे आयोजन केले असून त्याअंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी पीएमपी पात्र ठरली आहे. केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यातील फेरीसाठी पात्र ठरलेल्या ४६ शहरांची यादी जाहीर केली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पात्र शहरांची नावे दिल्लीत जाहीर केली. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक व्यवस्था असलेल्या पीएमपीचा या यादीत समावेश आहे.

केंद्र सरकारकडून १५ एप्रिल २०२१ रोजी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांना उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. या स्पर्धेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या वतीने पीएमपीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पीएमपीने पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने सर्वेक्षण केले होते. त्याअंतर्गत ११ हजार प्रवाशांची मते जाणून घेण्यात आली होती. पीएमपीच्या चार हजाराहून अधिक चालक, वाहक तसेच ३ हजार ८०० पेक्षा जास्त अन्य वाहनचालकांची मते जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणानंतर सखोल विश्लेषण करून पाच प्रमुख समस्या पीएमपीने निश्चित केल्या आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करून मंत्रालय स्तरावर समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.