उन्नती कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. झेन्सार व उन्नती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने थरमॅक्सने शुक्रवारी आपल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला रोजगार उपलब्ध करून दिला.
उन्नती केंद्रामध्ये सत्तर दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला नोकरीवर रूजू करण्यास पुढाकार घेण्यासाठी उद्योगसमूह एकत्र आले. या उमेदवारांना आठ ते बारा हजार रुपये वेतनाच्या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
उपक्रमाबाबत बोलताना थरमॅक्सच्या संचालिका अनू आगा म्हणाल्या की, या केंद्राच्या माध्यमातून आम्ही उद्योगांच्या गरजांची पूर्तता व बेरोजगार युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भक्कम पायाभरणी करू इच्छितो. जास्तीत जास्त युवकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. थरमॅक्स सोशल इनिशिएटीव्ह फाउंडेशन व झेन्सार फाउंडेशन यांनी पालिकेच्या सहयोगाने व उन्नती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चालविलेल्या कौशल्य विकास केंद्राने यावर्षी जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात केली. या केंद्रामध्ये युवकांना व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना साजेशी नोकरी मिळविण्यासाठी सक्षम केले जाते. या प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करण्यात येत नाही.
झेन्सारचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश नटराजन म्हणाले की, भारताला २०२२ पर्यंत पाचशे दशलक्षांपेक्षा जास्त कुशल कार्यबळाची आवश्यकता आहे. आमचा हा उपक्रम या गरजेसाठी पुणे शहरातून योगदान देईल. वार्षित तत्त्वावर १८ ते ३५ वयोगटातील दोनशे ते तीनशे उमेदवारांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याचे, त्याचप्रमाणे त्यांना निश्चित रोजगार उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. हे केंद्र सध्या स्वारगेट येथील पीएमटी इमारतीत कार्यरत आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी पुणे पालिकेच्या नागरी समुदाय विकास विभागाकडून सुविधा पुरविण्यात येत आहेत. केंद्रामध्ये तरुणांना प्रशासकीय सहायता, आतिथ्य व किरकोळ विक्री या क्षेत्रांमध्ये रोजगार मिळविण्यासाठी प्रशिक्षण पुरविण्याबरोबरच दैनंदिन आयुष्यात गरजेची असलेली कौशल्यं, संवाद कौशल्य, इंग्रजी संभाषण व संगणकाचे प्राथमिक ज्ञानही दिले जाते.