‘त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटीवर महाविद्यालयांना दिलेली तात्पुरती मान्यता ग्राह्य़ धरण्यात येणार नाही,’ या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूचनेची तंत्रशिक्षण महाविद्यालयांना आठवण करून देणारे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहे. मात्र प्रत्यक्षात हा नियम गेल्या वर्षीही असतानाही त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटीवर संलग्नता दिलेल्या अनेक महाविद्यालयांमध्ये या वर्षी प्रवेशही झाले आहेत.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची परिस्थिती वादात आहे. विद्यापीठाची स्थानिक चौकशी समिती, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समित्या, तंत्रशिक्षण संचालनालय अशा विविध स्तरांवरून पाहणी होऊन मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमध्येही सातत्याने त्रुटी आढळून येतात. त्याबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर ‘संपूर्ण मान्यता’ असलेल्या महाविद्यालयांनाच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केला. त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटीवर दिलेली मान्यता ग्राह्य़ धरण्यात येणार नाही, असेही तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले होते. या निर्णयाची आठवण करून देत संपूर्ण संलग्नीकरण मिळण्यासाठी ‘स्थानिक चौकशी समितीच्या भेटीचे आयोजन करण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. मात्र गेल्या वर्षीही हा नियम असतानाही अटींसह मान्यता दिलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशही झाले आहेत आणि विद्यापीठानेही त्याकडे कानाडोळा करण्याचीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
विद्यापीठाच्या कक्षेत राज्यातील सर्वाधिक अभियांत्रिकी महाविद्यालये येतात. मात्र, यातील काही महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा, पुरेसे शिक्षक नसल्यामुळे या महाविद्यालयांना मान्यता देण्यात येऊ नये अशी शिफारस स्थानिक चौकशी समित्यांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. संलग्न महाविद्यालयांच्या यादीतून या महाविद्यालयांना वगळण्यात न आल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयानेही प्रवेश प्रक्रियेत या महाविद्यालयांचा अंतर्भाव केला. या महाविद्यालयांमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशही झाले. प्राथमिक निकषही पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अजूनही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे या वर्षीचे पत्रही दिखावूच ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.