विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखा निवडण्याचे वर्षभरात तीन पर्याय
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा (जेईई) घेण्याला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्याच्या प्रवेश परीक्षेचे हे शेवटचे वर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षांतून तीनवेळा जेईई घेण्यात येणार असल्यामुळे आपल्या सोयीनुसार परीक्षेची तारीख निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांनी मिळणार आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा घेण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे. पुढील वर्षांपासून (२०१८) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील परीक्षेचे हे शेवटचे वर्ष असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेप्रमाणे जेईई वर्षांतून तीनवेळी घेण्यात येणार आहे.
सध्या जेईई मेन्स परीक्षेचे नियोजन केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) करते. मात्र देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे नियोजन सीबीएसईकडेच राहणार का, या परीक्षेची रचना कशी असेल, अभ्यासक्रम कसा असेल याबाबतचे तपशील अद्याप अंतिम झालेले नाहीत.
याबाबत एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनीस सहस्रबुद्धे यांनी सांगितले, ‘एआयसीटीईने परीक्षा घेण्यासाठी मंजुरी दिली आहे. देशभरात परीक्षेचे नियोजन करताना वेगवेगळे प्रदेश, तेथील उत्सव, परीक्षांची वेळापत्रके हे सगळे लक्षात घेऊन एकच तारीख ठरवणे अडचणीचे असते. त्यासाठी वर्षांतून तीनवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. दिलेल्या तारखांपैकी कोणत्या तारखेला परीक्षा घ्यायची हे विद्यार्थी ठरवू शकतील. या परीक्षेबाबतचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्याबाबत राजपत्र प्रसिद्ध होईल.’ देशातील भाषिक विविधता लक्षात घेऊन परीक्षेची रचना असेल, असे सूतोवाचही सहस्त्रबुद्धे यांनी केले.
नक्की काय होणार? : एका विद्यार्थ्यांला वर्षांतून एकदाच ही परीक्षा देता येईल. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरल्यानंतर आपल्या सोयीनुसार परीक्षेची तारीख निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी जेईई मेन्स आणि त्यानंतर आयआयटीसाठी जेईई अॅडव्हान्स द्यावी लागणार आहे.