चित्रपटामध्ये भूमिका केलेल्या ‘चिंटू’ शुभंकर अत्रे याला भरविलेला केक.. रौप्यमहोत्सवी वर्षांतील ‘चिंटू’ची वाटचाल दर्शविणारे प्रदर्शन.. चित्रकार चारुहास पंडित यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडलेली ‘चिंटू’ या हास्यचित्रमालिकेच्या निर्मितीमागच्या रंजक कथा.. अशा मुलांच्या गर्दीने भारलेल्या उत्साही वातावरणात सर्वाचा लाडका ‘चिंटू’ शनिवारी २५ वर्षांचा झाला.
दररोज सकाळी निरागसतेतून आपल्याला हसविणाऱ्या खटय़ाळ चिंटूने २५ व्या वर्षांत पदार्पण केले. हे औचित्य साधून संवाद पुणे आणि गंगोत्री ग्रीनबिल्ड यांच्यातर्फे बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या चिंटू या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले. ‘चिंटू’चे निर्माते चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर यांच्या पत्नी चित्रा वाडेकर, चिंटू चित्रपटाचे निर्माते श्रीरंग गोडबोले, शुभंकर अत्रे, सुनील महाजन, गणेश जाधव, अमृत पुरंदरे आणि आनंद खाडिलकर या वेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन सोमवापर्यंत (२३ नोव्हेंबर) सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत खुले राहणार आहे.
गोडबोले म्हणाले, आजुबाजूला पाहिल्यावर आपल्याला केवळ क्रोध, िहसा, युद्ध, मारामारी अशा समस्यांनी भारलेले जग दिसते. मात्र, या चिंटूकडे पाहिल्यावर हरवलेली मूल्ये पुन्हा गवसतील असा आशावाद मिळतो. हेच सामाजिक भान जपत चिंटूने विश्वासार्हता कमावली आहे. महाराष्ट्रातील सर्व माणसे चिंटूशी जोडली गेली आहेत.
श्रीरंग गोडबोले म्हणाले, प्रभाकर वाडेकरमधील खटय़ाळपणा चिंटूच्या रूपात आपल्यासमोर आला. पण, या खटय़ाळपणाला विचारांची जोड आहे. त्यामुळेच हा चिंटू सर्व वाचकांना अंतर्मुख करणारा झाला. लहान मुलाच्या निव्र्याजतेतून जागतिक सत्य सांगण्याचा प्रयत्न चिंटूने केला. चिंटूने सर्वाना पोट भरभरून हसविले. कोणावर टीका केली नाही की कोणाच्या व्यंगावर बोट ठेवले नाही. मराठी संस्कृतीचा अर्क चिंटूमार्फत पोहोचला.
२५ वर्षांच्या प्रवासात प्रत्येक चिंटू वेगळा असेल याची दक्षता आम्ही घेतली. त्याला मिळालेला प्रतिसाद हा चिंटूला आणि आम्हालाही एक नवी ऊर्जा देत असतो, असे चारुहास पंडित यांनी सांगितले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.