पश्चिम घाटाबद्दल डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. कस्तुरीरंजन यांनी शासनाला दिलेल्या अहवालांमध्ये त्रुटी असल्याची तक्रार पर्यावरण सल्लागार व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे.
डॉ. गाडगीळ आणि डॉ. कस्तुरीरंजन यांच्या समितीमध्ये संपूर्ण पश्चिम घाट पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणे ही पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणून ओळखणे योग्य ठरणार नाही, असे या संघटनेचे म्हणणे आहे. या अहवालानुसार पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून निवडण्यात आलेल्या गावांच्या सीमा या स्पष्ट होत नाहीत. अधिसूचनेच्या प्रारूपामध्ये स्पष्ट केलेले पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून ६०० मीटरवर असलेले गृहीत धरण्यात आले आहे. मात्र, अहवालातील अनेक गावे ही समुद्रसपाटीपासून ६०० मीटरपेक्षा कमी उंचीवर आहेत. अधिसूचनेच्या प्रारूपामध्ये दिलेले अक्षांश-रेखांश आणि दिलेल्या गावांचे स्थान याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे संपूर्ण गाव हे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांत मोडते की गावाचा काही भागच पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील भागात आहे, याचे स्पष्टीकरण शासनाने दिलेले नाही. सावंतवाडी तेथे पर्यावरणीय निरीक्षणात आलेल्या वनस्पती व वन्यजीव प्रजाती या आंतरराष्ट्रीय यादीमध्ये अत्यंत खालच्या स्तरावर आहेत.
ही अधिसूचना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला गेला असल्याची तक्रारही संघटनेकडून करण्यात आली आहे.