पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आजमितीला २० लाख इतकी असल्याची माहिती महापालिकेने जाहीर केली आहे. शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३.६३ टक्के असून स्त्रियांपेक्षा पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत गुंडाळून ठेवलेल्या व चार वर्षांनंतर तयार केलेल्या पर्यावरण अहवालात शहरातील विविध विषयांचे धक्कादायक वास्तव मांडण्यात आले आहे. लोकसंख्या  वाढीची कारणे व अन्य बाबींचे विश्लेषण अहवालात आहे. १९५१ च्या जनगणनेनुसार पिंपरी शहराची लोकसंख्या २६ हजार ३६७ होती. १९६१ मध्ये ३९ हजार,  १९७१ मध्ये ९८ हजार, १९८१ मध्ये दोन लाख ५१ हजार आणि १९९१ मध्ये पाच लाख २० हजार इतकी लोकसंख्या होती. २००१ च्या जणगणनेनुसार ती १० लाख ६ हजारावर तर २०११ मध्ये १७ लाख २९ हजार होती. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या २० लाख असावी, असा अंदाज करत २०२१ मध्ये २१ लाख ५० हजार तर २०३१ मध्ये २९ लाख लोकसंख्या असेल, अशी शक्यता पर्यावरण अहवालात गृहीत धरण्यात आली आहे.
शहरातील ६० टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या स्थलांतरित लोकांची आहे. एक हजार पुरूषामागे ९१६ स्त्रिया आहेत. मागील दोन दशकात लोकसंख्या वाढीचा दर ७२ टक्के व ९३ टक्के आहे. शहराच्या लोकसंख्येची घनता पुणे शहराच्या तुलनेत कमी आहे. येथील जास्त घनता शहराच्या मध्यभागी आहे. मोरवाडी, खराळवाडी, पिंपरी वाघेरे, पिंपळे सौदागर या भागातील रस्ते अजूनही अरूंद असून येथे अपेक्षित विकास झालेला नाही. एका बाजूस नद्या व दुसऱ्या बाजूस संरक्षण क्षेत्र असल्याने शहराच्या वाढीस मर्यादा आहेत. त्यामुळे केवळ मुंबईच्या दिशेने शहराची वाढ होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.