पुणे : युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्तुतो यांनी बुधवारी मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. पुणे मेट्रोसाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने भरीव अर्थसाहाय्य केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७४ टक्के पूर्ण झाला आहे. युरोपियन बँकेचे पदाधिकारी मेट्रो प्रकल्पाचा नियमित आढावा घेत असतात. उगो अस्तुतो यांच्या या भेटीमुळे मेट्रो आणि युरोपियन समुदाय यांच्यातील संबंध दृढ होतील, असा विश्वास महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उगो अस्तुतो यांनी मेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, विनोद अग्रवाल यांनी मेट्रो प्रकल्पाची माहिती युगो अस्तुतो यांना दिली.
उगो अस्तुतो, युरोपियन युनियनच्या व्यापार आणि आर्थिक व्यवहार प्रमुख मंत्री रेनीटा भास्कर आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी फुगेवाडी स्थानक ते पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते संत तुकारामनगर स्थानक असा प्रवास मेट्रोतून केला. मेट्रो स्थानकांच्या वैशिष्टय़पूर्ण संरचनेबाबत उगो अस्तुतो यांनी समाधान व्यक्त केले.
हवामान बदलाविरोधात तसेच हरित सार्वजनिक वाहतुकीच्या विकासासह शाश्वत शहरीकरणासाठी युरोपियन युनियन आणि भारत एकत्र काम करत आहे. युरोपियन बँकेने भारतातील सहा शहरी रेल्वे प्रकल्पांमध्ये २.१ अब्ज युरोची गुंतवणूक केली आहे. पुण्यातील मेट्रो वाहतुकीच्या पर्यायांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि परवडणारा पर्याय देईल, असे उगो अस्तुतो यांनी सांगितले.