आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. प्रारूप मतदार यादींवर मोठ्या प्रमाणावर हरकती-सूचना देण्यात आल्या असून त्याचा निपटारा करण्यास पुरेसा अवधी मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून २१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ५८ प्रभागांसाठी प्रारूप मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मतदार यादीवर ५ हजार ९० हरकती सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची अर्धवट नावे, पत्ते आढळले आहेत. या मतदारांचे याद्यांमध्ये फोटोही नसल्याने प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करताना महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. या सर्व हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही ही कामे सुरूच आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने नऊ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर त्याला १६ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र हरकतींचा निपटारा स्थळ पाहणी करून योग्य पद्धतीने करण्यास पुरेसा वेळ मिळाला, यासाठी पुन्हा मदतवाढ देण्यात आली आहे. प्रभागांची अंतिम मतदार यादी २१ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.