शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा नोंदणीमध्ये अद्यापही बाराशेहून अधिक शाळांची नोंदणी बाकी आहे.
हेही वाचा- इंदापूरमधील ब्रिटिशकालीन डिकसळ पूल बंद; भिगवण बाजारावर परिणाम
आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्यामुळे आरटीई प्रवेशांकडे पालकांचे लक्ष असते. त्यानुसार यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांना २३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु मुदतीत अनेक शाळांची नोंदणीच झाली नसल्यामुळे शाळा नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली. शाळा नोंदणीसाठी आता पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण न झाल्यास, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांची असेल असेही स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा- पुण्यात खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, मजुराचा मृत्यू, एक जखमी
आरटीई प्रवेशांसाठी साधारणपणे ९ हजार २३० शाळांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यातील ८ हजार २१ शाळांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे अद्यापही बाराशेहून अधिक शाळांची नोंदणी बाकी असल्याचे चित्र आहे. अनेक जिल्ह्यांतील शाळा नोंदणी ७५ टक्क्यांहून अधिक झाली असून, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील शंभर टक्के शाळा झाल्याचे चित्र आहे.