डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णावर उपचार केलेले थकलेले पैसे बँकेच्या खात्यावर भरण्यास लावणारा भामटा ‘ट्र कॉलर’ या मोबाईलवरील अॅप्लिकेशमुळे बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केली आहे.
अमित जगन्नाथ कांबळे (वय २२, रा. निंबाळकर वाडी, नवी पेठ), सोमनाथ बबनराव पायगुडे (वय २९, रा. नवी पेठ) आणि अमोल गजेंद्र सातव (वय २२, रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी संजय अनंत तोरखडे (वय ३८, रा. माऊली कृपा सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरखडे यांची पत्नी रुपाली यांच्या पायावर के.ई.एम हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपी कांबळे याने हॉस्पीटलमधे दूरध्वनी करून कोणाकोणाचे उपाचाराचे बिल थकल्याची माहिती काढली. त्यानंतर तोरखडे यांना फोन करून, उपचाराचे बिल थकले असून तत्काळ भरावे, असे सांगितले. त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर पुन्हा फोन करून पैसे भरण्यासाठी बँकेचा खातेक्रमांक दिला. तोरखडे यांच्या मोबाईलवर ट्र कॉलरचे अॅप्लिकेशन असल्यामुळे आरोपी जे नाव सांगत आहे, ते चुकीचे असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी याबाबत तक्रार केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.