अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांचा आरोप
राज्यात, परराज्यात व परदेशातही अनेक बोगस औषध कंपन्या तयार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. या कंपन्या मानवी जीवाशी खेळ करत आहेत, असे विधान पुण्याचे पालकमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री गिरीश बापट यांनी िपपरीत बोलताना केले. मंत्री म्हणून जितके लक्ष ‘हाफकिन’कडे द्यायला हवे होते, तितके देऊ शकलो नाही, अशी कबुलीही बापट यांनी या वेळी दिली.
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. िपपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, महामंडळाच्या कार्यकारी संचालिका सीमा व्यास, महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जयसिंग पवार, सदाशिव खाडे, प्रवीण वाघमारे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खूप स्पर्धा आहे. मात्र, तरीही ‘हाफकिन’ने दर्जेदार उत्पादन निर्माण करून सातत्य राखले आहे.
अनेक बोगस औषध कंपन्या निर्माण होत असून त्यातून मानवी जीविताशी खेळ सुरू आहे. मात्र, असे होता कामा नये.
विविध उत्पादनाद्वारे समाजाप्रती असणारे कर्तव्य पार पाडणाऱ्या या संस्थेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल. संस्थेच्या रम्य परिसरात भविष्यात नवीन संशोधन करून आणखी काय उत्पादन करता येईल, याचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
‘मंत्रिपदाला धोका नाही’
मंत्र्याला सगळेच कळते असे काही नाही. मी जमिनीवर चालणारा मंत्री आहे. माझ्या मंत्रिपदाला कोणताही धोका नाही. मंत्रिपदी मी कायम राहणार असून संस्थेच्या वर्धापनदिनासाठी पुढील वर्षीही मी येणार आहे, असे गिरीश बापट या वेळी म्हणाले.