scorecardresearch

Fandry Marathi movie: ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

१९ वर्षांच्या योगेश चौधरी याने फॅन्ड्री चित्रपटात काम केले होते.

Fandry Marathi movie: ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक
Fandry actor : योगेशसह अमोल किसन अवचरे , प्रतिक संजय वाघमारे , बिपीन बाळकृष्ण कुलकर्णी आणि सराफ सागर अशोक शहाणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षक आणि समीक्षकांकडून गौरवण्यात आलेल्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटासंदर्भात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. १९ वर्षांच्या योगेश चौधरी याने फॅन्ड्री चित्रपटात काम केले होते. ग्रामीण समाजाच्या वास्तववादी चित्रणामुळे ‘फॅन्ड्री’ हा चित्रपट विशेष गाजला होता. मात्र, आता या घटनेमुळे चित्रपटाशी संबधित कलाकाराचे धक्कादायक वास्तव उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

योगेश आणि त्याच्या साथीदारांनी काही दिवसांपूर्वी पर्वती परिसरातील एका नामांकित वकिलाच्या बंगल्यात चोरी करुन एक किलो सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांसह तब्बल २३ लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला होता. ही चोरी उघडकीस आल्यानंतर दत्तवाडी पोलीस व गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरू होता. या तपासादरम्यान कासेवाडी झोपडपट्टीतील काही मुले पिंपरीत सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अमोल अवचरे व योगेश चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आठ ते दहा दिवसांपूर्वी पर्वती येथील एका बंगल्यात घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यांच्या घराची झडती घेतली असता सोन्याचे दागिने व कापलेला पत्रा मिळून आला. यावेळी पुढील तपासात अटक करण्यात आलेल्यांपैकी योगेश चौधरीने ‘फॅन्ड्री’ सह चार ते पाच माहितीपटात काम केल्याचे समोर आले.  योगेशसह अमोल किसन अवचरे , प्रतिक संजय वाघमारे , बिपीन बाळकृष्ण कुलकर्णी आणि सराफ सागर अशोक शहाणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-06-2016 at 20:40 IST

संबंधित बातम्या