‘डिलिव्हरी’तून टपाल खात्याला वर्षभरात एक कोटीचा महसूल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीसाठी वापरऱ्या जाणाऱ्या साहित्याची मागणी ‘ई-कॉमर्स’ किंवा ‘एम-कॉमर्स’द्वारे नोंदवण्याकडे शेतक ऱ्यांचा कल वाढत असून राज्यात ठिकठिकाणी पोस्टमन हे साहित्य पोहोचवत आहेत. शेती साहित्याची विक्री करणाऱ्या आणि पुण्यात साठवणगृहे असलेल्या चार कंपन्या टपाल खात्याच्या माध्यमातून राज्यभर या वस्तू पोहोचवत आहेत. गेल्या एका वर्षांत केवळ कृषी साहित्य पोहोचवण्यासाठी टपाल खात्याला एक कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

बी-बियाणे, खते, फवारणी यंत्रे, टार्पोलिन, छोटे पंप, अवजारे अशा विविध वस्तू शेतकरी ‘ई-कॉमर्स’चा वापर करून मागवत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हा कल वाढता असून टपाल खात्याकडे येणारी मागणी दरवर्षी २० ते २५ टक्क्य़ांनी वाढते आहे.

‘पुणे शहरात कृषी साहित्य विक्रीतील काही कंपन्यांची साठवणगृहे आहेत. दरमहा साधारणत: १५ हजार व्यवहार या माध्यमातून होताना दिसतात. गेल्या वर्षी (२०१६-१७) जवळपास दहा कोटी रुपयांचे कृषी साहित्य टपाल खात्याने पोहोचवले,’ असे पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी सांगितले.

कृषी साहित्य पोहोचवण्याबरोबरच विविध प्रकारची ‘पार्सल’ पोहोचवण्यासाठीही टपाल खात्याकडे येणारी मागणी मोठी आहे. गेल्या वर्षी ‘पार्सल’ची टपाल खात्याकडील मागणी आधीच्या तुलनेत दोनशे टक्क्य़ांनी वाढली, असेही सावळेश्वरकर म्हणाले. ‘पार्सल डिलिव्हरी’मध्ये खासगी संस्था कार्यरत असल्या तरी ते पोहोचवत असलेली पार्सलं प्रामुख्याने संकेतस्थळांवर नोंदवलेल्या मागणीची असतात. त्यामुळे टपाल खात्याशी त्यांची असलेली स्पर्धा केवळ वीस टक्के असते. कागदपत्रांची पार्सलं पोहोचवणाऱ्या खासगी संस्था कमी आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

रजिस्टर्डपत्रे, ‘स्पीड पोस्टचा वापर वाढला

मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या धबडग्यात आता पत्रे कोण लिहित असेल असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हाताने लिहिल्या जाणाऱ्या पत्रांची संख्या कमी झाली असली तरी दुसऱ्या बाजूस ‘रजिस्टर्ड’ पत्रे व ‘स्पीड पोस्ट’च्या मागणीत वाढ झाली आहे. पुणे विभागात ‘रजिस्टर्ड’ अर्थात पोचपावती देणाऱ्या पत्रांमध्ये २०१५-१६ मध्ये ३ ते ४ टक्क्य़ांची वाढ झाली, तर ‘स्पीड पोस्ट’मध्ये ५ ते ८ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers using e commerce
First published on: 21-07-2017 at 04:12 IST