परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून कृत्य 

आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून टिळक महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीने वेताळ टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी या तरुणीने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, ‘मी नापास झाले असून, तुमची मुलगी होऊ शकत नसल्याने आत्महत्या करीत आहे,’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. तरुणीचे आई-वडील डॉक्टर आहेत. पूर्वा श्रीप्रसाद बावडेकर (वय २०, रा. एरंडवणा, म्हात्रे पूल) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती टिळक महाविद्यालयात आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या (बीएएमएस) पहिल्या वर्षांला शिकत होती. महाविद्यालयाने पहिल्या वर्षांचा निकाल बुधवारी जाहीर केला. त्यात ती अनुत्तीर्ण झाली होती. ती संध्याकाळी घरी न आल्यामुळे तिच्या आईने मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिचा मोबाइल बंद होता. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. वेताळ टेकडीच्या परिसरात गुरुवारी तिचा मृतदेह आढळून आला. पर्समधील डायरीमध्ये तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली.