कात्रज भागातील घटना; १२ जण अटकेत
पुणे : मैत्रिणीवरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. दोन्ही गटातील तरुणांनी दहशत माजवून तोडफोड केली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत विशाल सोमवंशी (वय २१) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदेश शिळीमकर, अमित थोपटे यांच्यासह आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशालचा भाऊ विनोद आणि आरोपी आदेश शिळीमकर यांच्यात मैत्रिणीवरून वाद झाले होते. या कारणावरुन आदेश आणि त्याच्या साथीदारांनी विशाल, त्याचा भाऊ विनोद यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले.
दरम्यान, आदेश शिळीमकर (वय २३) याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, विनोद सोमवंशी, विशाल सोमवंशी, आकाश उणेचा यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश आणि विनोद यांच्यात मैत्रिणीवरून वाद झाले होते. वाद मिटवण्यासाठी विनोद, विशाल आणि साथीदार घराजवळ आले. आरोपींनी दहशत माजवून दुकानांच्या दरवाज्यावर दगडफेक केली. कोयते दाखवून दहशत माजविली असे शिळीमकरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दोन गटात हाणामारी झाल्याने आंबेगाव बुद्रुक भागात तणाव निर्माण झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी टोळक्यातील १२ जणांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले तपास करत आहेत.