समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी कलाकारांनी जरूर प्रयत्न करावेत, मात्र चित्रपट बनविताना देशाच्या इतिहासाला त्यातून धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगत संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शनिवारी मत मांडले.

‘अ.ब.क.’ चित्रपटाच्या लघुचित्रफितीचे (टीझर) अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी बोलून दाखविली.

महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून प्रत्येक भारतीयाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. मुलींच्या विकासासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानावर आधारित असलेल्या ‘अ.ब.क.’ चित्रपटाच्या लघुचित्रफितीचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ग्रॅव्हिटी एंटरटेनमेंट’ संस्थेची निर्मिती असलेला हा चित्रपट मराठी बरोबरच इतर १४ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील एका गीतासाठी फडणवीस यांनी पाश्र्वगायन केले आहे.