ईमेलवरून परदेशात आर्थिक व्यवहार करत असाल तर सावधान..कारण गेल्या काही दिवसांपासून परदेशात व्यापार करणाऱ्या उद्योगपतींना त्यांचे व्यवहार सुरु असलेल्या कंपनीसारखाच बनावट ईमेल पाठवून व्यवहाराची रक्कम दुसऱ्या खात्यावर भरण्यास सांगितली जाते. काही वेळातच ही रक्कम त्या खात्यावरून काढली जाते. एका महिन्यात पुणे सायबर शाखेकडे अशा प्रकारे फसवणूक केल्याच्या तीन ते चार तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये यामध्ये साठ लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे. यातील एका व्यापाऱ्याला सायबर शाखेच्या तत्परतेमुळे ४६ लाख रूपये परत मिळाले आहेत.
भारतातून परदेशातील उद्योगपती, व्यापारी अनेक कंपन्यांशी व्यापार करतात. त्यासाठी खास करून जीमेल, याहो मेलचा वापर करतात. पण, नायजेरियन व्यक्ती असे ईमेल आयडी ‘हॅक’ करतात. त्याच बरोबर त्यांच्या ईमेल सारखाच दुसरा ईमेल तयार करून संबंधित व्यापाऱ्याला कंपनीच्या नावाने मेल पाठविला जातो. त्या ईमेलमध्ये, कंपनीचा बँकेचा खातेक्रमांक बदलला असून आता या बँकेत कंपनीचे नवीन खाते उघडले आहे.  खरेदी केलेल्या मालाची रक्कम त्या खात्यावर भरावी, असे लिहिलेले असते. कंपनी व व्यापाऱ्यांमध्ये सतत ईमेलवरून व्यवहार सुरू असल्यामुळे त्याची शहानिशा न करता मेलमध्ये दिलेल्या बँकेच्या खात्यावर रक्कम भरली जाते. काही दिवसांनी कंपनीकडून पैशाची मागणी होते, तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस येतो. गेल्या आठवडय़ात सायबर शाखेकडे अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे.
बोपोडी येथील श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीज ही कंपनी मिल्क सप्रेशन मशिनचे सुटे भाग परदेशात निर्यात करते. परदेशातील कंपन्यांशी संपर्क ठेवण्यासाठी जीमेलचा वापर ही कंपनी करत होती. ३० जून ते २ जुलै २०१३ दरम्यान नायजेरियातील अज्ञात व्यक्तींने त्यांचा मेल आयडी वापरला. त्यांची ग्राहक असलेल्या कॅनडा येथील कंपनीला ई-मेल करून व्यवहाराची रक्कम लंडन येथील एचएसबीसी बँकेच्या खात्यात (२६ हजार अमेरिकन डॉलर) भरण्यास सांगितले. दुसऱ्या घटनेमध्ये भोसरी येथील दुथरेड गेजेस्ट अॅन्ड प्रा. लि. ही कंपनी परदेशात मेकॅनिकल स्पेअर पार्ट्स निर्यात करण्याचा व्यवसाय करते. त्यांचे दुबई येथील ग्राहक कंपनीला गेल्या आठवडय़ात अशाच पद्धतीने बनावट मेल पाठवून व्यवहाराचे सव्वा तीन लाख रुपये मुंबई येथील एक्सिस बँकेत भरण्यास सांगितले. त्या कंपनीने कोणतीही खात्री न करता हे पैसे भरले. पुण्यातील कंपनीने फोन करून पैशाची मागणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.  एका महिन्यापूर्वीही पुण्यातील व्यापाऱ्याला कंपनीच्या नावाने मेल पाठवून चीन येथील एका बँकेत पैस भरण्यास सांगितले होते. त्याने पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्याला समजले. त्या व्यापाऱ्याने सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतर सायबर शाखेने चीन बँकेशी संपर्क साधल्यानंतर हे पैसे बँकेने परत दिले होते.
याबाबत आर्थिक व सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले की, परदेशात आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी मोफत ईमेल न वापरता विकत घेतलल्या ईमेल किंवा स्वत:च्या कंपनीच्या ईमेल आयडीचा वापर करावा. बँकेचे खाते बदलल्याचा ईमेल आल्यास त्याची फोन किंवा फॅक्स करून खात्री करून घ्यावी. त्यानंतर आर्थिक व्यवहार करावेत. आर्थिक व्यवहार परदेशात करताना डिजिटल सिग्नेचरचा वापर करावा. डिजिटल सिग्नेचर वापरून पाठविलेले ईमेल हे अधिकृत व न्यायालयाच्या पुराव्याच्या दृष्टीने ग्राह्य़ धरले जातात. तसेच ते  अधिक सुरक्षित असल्याने अशा फसवणुकींना बळी पडण्याची शक्यता कमी असते. कंपन्यांनी ईमेल आयडीबाबत धोरण निश्चित करावे. एका पेक्षा जास्त व्यक्तींनी कंपनीचे आर्थिक व्यवहार संबंधित ईमेलवरून करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले.