जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायमच असते. दोन दिवसांपूर्वी एका ऊस कामगार महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले होते. ही घटना ताजी असतानाच जुन्नर तालुक्यातील ओझर येथे राजेंद्र जगदाळे यांच्या ऊसाच्या शेताला लागलेल्या आगीत बिबट्याच्या तीन बछड्यांचा जळून मृत्यू झाला. वीज वाहक तारा पडून आग लागल्याची घटना घडली. बिबट्याचे तिन्ही बछडे मादी होते अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार ओझर येथील राजेंद्र जगदाळे यांच्या उसाच्या शेतातून विजेचा खांब गेला आहे. याच खांबाच्या वीज वाहक तारा पडून शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे या शेतात आग लागली. याच आगीत बिबट्याचे तीन बछडे होरपळून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांना रात्री उशिरा एक मृतावस्थेतील बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पण एक मादी बिबट्या परिसरात फिरत असल्याने तिसरा मृत बछडा वनविभागाने ताब्यात घेतलेला नाही.