पानशेत येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली.
िपटू ऊर्फ प्रमोद तुकाराम पासलकर (वय ३६), तुषार तुकाराम पासलकर (वय ३०), पप्पू ऊर्फ प्रवीण तुकाराम पासलकर (सर्व रा. पानशेत कॉलनी, पानशेत, ता. वेल्हा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर दौलत तावरे (वय २६, रा. जांभळी, ता. हवेली.) याने फिर्याद दिली आहे. या घटनेमध्ये ज्ञानेश्वर याच्यासह शरद लक्ष्मण रानवडे (वय ३०, रा. रुळे, ता. वेल्हे) हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींच्या घरात शिरून काही दिवसांपूर्वी पप्पू तावरे याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे नेले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी ज्ञानेश्वर तावरे हा पप्पूच्या ओळखीचा व गावातला असल्याने त्याला व त्याचा मित्र रानवडे याला आरोपींनी शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांच्यावर पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.