पुण्यात पोलीस शिपायावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. अक्षय अनिल सोनी (वय १९, रा. आनंद कॉलनी, मूळ रा. परभणी) असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर अक्षय स्वतःहून पोलिसांपुढे हजर झाला. पोलिसावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराच्या गाडीवर पाठीमागे अक्षय बसला होता. हल्लेखोर आरोप अद्याप फरार आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या मयूर राजेंद्र भोकरे यांनी मंगळवारी एका व्यक्तीच्या कंबरेला देशी बनावटीचे पिस्तूल पाहिली. त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्याने संशयिताचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचेया व्यक्तीला लक्षात आल्यावर त्याने आपटे रस्त्यावर पोलिसाच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी भोकरे यांच्या बुटाला चाटून गेली. यानंतर ती व्यक्ती घटनास्थळावरून दुचाकीवरून पळून गेली. भोकरे यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिल्यावर इतर पोलिस घटनास्थळी हजर झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पुंगळी जप्त केली आहे.