हंगामाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाऊस सरासरीच्या जवळपास पोहोचला असून, प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टय़ांमधील जिल्ह्यांत पावसाने दिलासा दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी आणि दुष्काळी पट्टे असलेल्या नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, सांगली, लातूर, जालना, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांत यंदा जून महिन्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे. काही ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला जिल्ह्यात पाऊस अत्यल्प असला, तरी इतर भागांत मात्र तो सरासरीजवळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ११ जूनला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी प्रवेश केला. त्यापूर्वी विविध ठिकाणी प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पूर्वमोसमी पाऊस कोसळला होता. वाऱ्यांच्या प्रवेशानंतर पहिल्या टप्प्यातच मोसमी पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात पावसाने बहुतांश भागात विश्रांती घेतली. त्यानंतर आता महिन्याच्या शेवटी पुन्हा कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी आहे. यंदा मोसमी वाऱ्यांचा राज्यातील प्रवास बंगालच्या उपसागरातील अनुकूल स्थितीमुळे कोकणाऐवजी दक्षिण भागातून झाला. परिणामी संपूर्ण कोकण व्यापण्यापूर्वीच मोसमी वाऱ्यांनी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भाग व्यापला होता. काही दुष्काळी पट्टय़ांमध्ये समाधानकारक पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागात दुष्काळी पट्टे आहेत. या सर्वच जिल्ह्यांसह बहुतांश भागात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सोलापूर आणि नगर जिल्ह्यांत सरासरीच्या दुप्पट आणि १०० टक्क्य़ांपुढे पावासाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी पट्टे आहेत. बीड, जालना, लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आदी जिल्ह्यांत पाऊस कमी असतो. मात्र, यंदा या भागांतही जूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. औरंगाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या दुप्पट नोंदविला गेला. विदर्भात यवतमाळ, अकोला वगळता नागपूर, अमरावती, बुलढाणा येथील पाऊस सरासरीच्या आसपास असून, वाशिममध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे पावसात आघाडीवर आहेत. इतर जिल्ह्यांत मात्र पावसाची सरासरी पूर्ण झालेली नाही.

सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक,

पण कोकणात कमी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून महिन्यात राज्यात सर्वाधिक १०३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतही चांगल्या (८४९ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली असली, तरी २९ जूनपर्यंत कोकण विभागातील इतर जिल्ह्यांत मात्र पावसाची सरासरी पूर्ण केली झाली नव्हती. पालघरमध्ये सर्वात कमी २५६ मि.मी. (सरासरी ३८५ मि.मी.) पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यात ३७१ मि.मी. (सरासरी ४३३ मि.मी.), तर मुंबई उपनगरांमध्ये ३८३ (सरासरी ४७५) पावसाची नोंद झाली.

जूनमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा  सरासरी प्रत्यक्ष पाऊस

सोलापूर १०० २०३

नगर   १०५ २१९

सांगली  १२४ १५८

नाशिक  १६७ २१९

औरंगाबाद   १२१ २४२

बीड १२३ २२६

जालना  १२७ १९६

लातूर   १३० २३६

नांदेड   १४७ १५६

परभणी १४० २०१

उस्मानाबाद  १२२ १५४

अमरावती   १३९ १५७

नागपूर  १५८ १८१

वाशिम  १५९ २३४

यवतमाळ   १५६ १०८

अकोला १३१ ८९

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First phase rainfall in the state is close to average abn
First published on: 30-06-2020 at 00:30 IST