लोणावळ्याजवळ जगातील पहिले संत विद्यापीठ साकारणार असून येथे देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे जतन केले जाणार आहे. ‘आदित्य प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून येत्या पाच वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल.
प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. शंकर अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपर्णा अभ्यंकर या वेळी उपस्थित होत्या.
अभ्यंकर म्हणाले, ‘‘लोणावळ्याजवळील तेहतीस एकर जागेत या विद्यापीठाचे बांधकाम करण्याचा प्रतिष्ठानचा मनोदय असून त्यासाठीची मान्यता संस्थेला नुकतीच मिळाली आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.’’
संस्थेच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त या वर्षी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘लक्ष्मी- वासुदेव राष्ट्रभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष असून एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी (११ एप्रिल) न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सायंकाळी साडेसहा वाजता हा सोहळा होणार आहे. १२, १३ व १४ एप्रिलला अनुक्रमे श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगीतिक चरित्रे सादर केली जाणार आहेत. या चरित्रांचे सादरीकरण डॉ. शंकर अभ्यंकर तसेच जितेंद्र आणि आदित्य अभ्यंकर करणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर १२ तारखेला सायंकाळी सव्वासहा वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमांसाठीची भारतीय बैठक व्यवस्था सर्वासाठी विनामूल्य आहे.