महापालिकेने हात झटकले, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट
पिंपरी-चिंचवड शहरात पवना नदीच्या पात्रात पुन्हा एकदा शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने असे प्रकार होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेने या संदर्भात हात झटकले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट दाखवले आहे.
वाकड-थेरगाव भागात विशेषत केजुबाई धरण परिसरात नदीपात्रात मृत मासे आढळून येण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. काही महिन्यांपूर्वी देहूत इंद्रायणी नदीच्या पात्रातही मृत माशांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर, या सर्व ठिकाणी फक्त पाहणी दौरे आणि चर्चा झाली. कोणतीही ठोस कार्यवाही झालीच नाही.
या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी सकाळी काही पर्यावरणप्रेमींना ताथवडे ते केजुबाई धरण दरम्यानच्या नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात मृत मासे आढळून आले, त्यात दोन कासवांचाही समावेश होता.
दोन कासवांचाही मृत्यू
रात्रभर नदीतून मृत मासे वाहून येत असल्याची माहिती त्यांनी पालिकेला कळवली. त्यानंतर, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. कित्येक महिन्यांपासून नदीत मृत माशांचा खच आढळून येतो. तथापि, त्याचे नेमके कारण अद्याप उघड होऊ शकलेले नसल्याने नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कंपन्यांचे सांडपाणी नदीत सोडण्यात येत असावे. त्यातून हे घडले की काय, याची चौकशी करू. महापालिकेला अशा प्रकरणात कारवाईचे अधिकार नाहीत. प्रदूषण मंडळाची ही जबाबदारी आहे. यापुढेही त्यांच्याकडून खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे.
– संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग