पुणे : डंपरमधून वाळू उतरवित असताना वाळूखाली दबून पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भाेर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडली. दुर्घटनेत बालकाची आई, तसेच त्याचा भाऊ, चुलत बहीण वाळूखाली दबले गेले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
आलोक अशोक कचरे (वय ५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याची आई आरती (वय ३५) भाऊ श्लोक (वय ६), चुलत बहीण प्रियंका (वय १५) हे जखमी झाले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरे कुटुंबीय नसरापूर परिसरातील धनगर वस्ती येथे राहायला आहेत. कचरे कुटुंबीयांचे जुने घर आहे. हे घर पाडण्यात आले असून, नवीन घर बांधण्याचे काम सुरू आहे. नवीन घराचा पाया खोदून तेथे खांबही उभे करण्यात आले आहे. जवळच एका पत्र्याच्या शेडमध्ये कचरे कुटुंबीय राहायला आहे. शनिवारी (८ नोव्हेंबर) बांधकाम साहित्य पुरवठदाराकडून अशोक कचरे यांनी वाळू मागविली होती. दुपारी दीडच्या सुमारास धनगर वस्ती परिसरात वाळू घेऊन डंपर चालक तेथे आला.
बांधकामाच्या ठिकाणी डंपरमधून वाळू उतरविण्याचे काम करण्यात येत होते. त्यावेळी डंपरचालकाने कचरे कुटुंबीय राहत असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ वाळू उतरविण्याच्या प्रयत्न केला. मात्र, डंपर चालकाच्या चुकीमुळे वाळू पत्र्याच्या शेडवर पडली. त्यावेळी शेडमध्ये आलोक, त्याची आई आरती, भाऊ श्लोक, प्रियंका होते. अचानक वाळूचा शेडवर पडल्याने पत्रा फाटला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली आलोक, त्याची आई आरती, भाऊ श्लोक, चुलत बहीण प्रियंका दबले गेले. रहिवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली.
वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या चौघांना नसरापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्यांच्या नाका तोंडात वाळू गेली होती. बेशुद्धावस्थेतील आलोक याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्याची आई, भाऊ, चुलत बहीण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ओैदुंबर अडवळ यांनी दिली.
लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेला मदत न केल्याप्रकरणी ‘माॅल’ प्रशासनाविरुद्ध गुन्हा
गणेशखिंड रस्त्यावरील एका माॅलच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी संबंधित माॅलच्या प्रशासनाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ५७ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माॅलचे प्रशासकीय अधिकारी, तसेच लिफ्टची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवाजीनगर भागात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी त्या गणेशखिंड रस्त्यावरील एका माॅलमध्ये गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर दोन नातेवाईकही होते. लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले. त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला.
काचेचा तुकडा उडल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली. महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि माॅलच्या प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथे आले नाही. निष्काळजीपणा, तसेच हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.
