पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पुणे महापालिकेच्या वतीने विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यान उभारण्यात आलेला उड्डाणपूल उद्या गुरुवारी (१ मे) वाहतुकीसाठी खुला होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. सोमवारी सिंहगड रस्त्यावर मोठ्या कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. पुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. हा उड्डाणपूल मार्चअखेर, तर माणिकबाग ते विठ्ठलवाडीदरम्यान उड्डाणपूल डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यानचा उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन केले जात नव्हते. या भागात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीची गंभीर समस्या असतानाही पुलाचा वापर नागरिकांना करता येत नव्हता.

कोंडीतून सुटकेची आशा

काम पूर्ण होऊनही उड्डाणपूल खुला केला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. सोमवारी सकाळीही या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राजाराम पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे येथे चार किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन १ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी यासाठी वेळ दिली असून, महापालिकेला तसे कळविण्यात आले आहे. त्यानुसार उद्घाटनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.- योगिता भोसले, नगरसचिव, पुणे महापालिका

महापालिकेचे ध्वजारोहण ६ वाजून २५ मिनिटांनी

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन १ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी सात वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त होणारे ध्वजारोहण या वर्षी सातऐवजी ६ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे. महापालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच इतक्या लवकर ध्वजारोहण होणार आहे.