देशाच्या आर्थिक विकासासाठी जाती मोडून दलित आणि सवर्णानी एकत्र येऊन लढा द्यावा, असे प्रतिपादन परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि प्रकाशक प्रा. विलास वाघ यांनी शुक्रवारी केले.
प्रा. विलास वाघ अमृतमहोत्सव गौरव समितीतर्फे इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते प्रा. विलास वाघ आणि उषाताई वाघ यांचा सत्कार करण्यात आला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य आणि गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे या प्रसंगी व्यासपीठावर होते.
प्रा. वाघ म्हणाले,‘‘जात गरिबीवर, राजकारणावर आणि धर्मावर मात करते. धर्म बदलला तरी तो आपली जात त्या धर्मामध्ये घेऊन जातो. जात नाही ती जात असे म्हणून समर्थनही केले जाते. जात आणि देशाचा विकास यांचा संबंध आहे, हा विचार कोणी गांभीर्याने करत नाही. आर्थिक लढा दलित आणि सवर्णानी एकत्र येऊन केला नाही. ज्याला त्याला आपली जात श्रेष्ठ वाटते. त्यामुळे जात सोडायला कोणी तयार नाही. अन्याय हाच न्याय असे वाटणाऱ्यांच्या देशात क्रांती कशी होणार?’’
संगणकासह व्यवसायाभिमुख कौशल्य आत्मसात केले नाही तर आरक्षण असूनही दलित आणि आदिवासी तरुणांना लाभ घेता येणार नाही, असे मत डॉ. थोरात यांनी व्यक्त केले. दलित युवकांनी महासंघाची स्थापना करून राजकीय क्षेत्रात युती आवश्यक असली तरी ती आपल्या शर्तीवर केली तरच सत्तेमध्ये वाटा मिळू शकेल, असेही ते म्हणाले. भांडवलशाही वाढली तर जातिव्यवस्थेचे निर्मूलन होईल, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार असल्याचे सांगून ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’तर्फे (डिक्की) दिशाभूल केली जात आहे. त्याचप्रमाणे आरक्षण धोरणावरदेखील अप्रत्यक्षपणे टीका केली जात आहे. मात्र, भांडवलशाही ही नफाधारित बाजारव्यवस्था आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. भांडवलशाहीमुळे विकास होईल हे सत्य असले तरी हा विकास समान पातळीवरचा होईल असा समज भ्रामक आहे. आरक्षणामुळेच दलितांचा उद्धार झाला आहे. एवढेच नव्हे तर, दलित-आदिवासींना दरमहा नियमित उत्पन्न मिळवून देण्याचे कार्य आरक्षणाने केले हे नाकारता येणार नाही. आरक्षणाचा लाभ पहिल्या पिढीला मिळाला. मात्र, केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता संगणकाचे ज्ञान आणि व्यवसायाभिमुख कौशल्य आत्मसात केले पाहिजे. अन्यथा आरक्षण असूनही त्याचा लाभ घेता येणार नाही. दलित राजकारण्यांविषयी प्रचंड नैराश्य असून ही चळवळ दिशाहीन झाली आहे.
डॉ. वासुदेव गाडे, उषा वाघ आणि भाई वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. कसबे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. परशुराम वाडेकर यांनी आभार मानले.