रोगमुक्त मानवी जीवनासाठी भारतीय गोवंशाच्या म्हणजेच एटू दुधाचा जागर देशस्तरावर करण्याची गरज आहे, असे मत एटू प्रसार मंचाचे अध्यक्ष डॉ. अशोक काळे यांनी व्यक्त केले. युरोपियन गाईंचे दूध हे मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यामुळे गंभीर आजार होतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
नवजीवन विकास सेवा संस्थेतर्फे नारायणगाव येथे नुकतीच राज्यस्तरीय ‘आरोग्यदायी एटू दूध व भारतीय गोवंशपालन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यात डॉ. काळे बोलत होते. मधुमेह, कर्करोग, हृदयरोग यांसारखे आजार समाजाला पोखरत आहेत. भारतीय गोवंशापासून मिळणारे दूध आरोग्यदायी असल्यामुळे त्याचा जागर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कार्यशाळेसाठी राज्यभरातून संशोधक व गोवंशतज्ज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये गोपालन व भारतीय देशी गोवंश, देशी गोवंशाची समृद्धी, गोठा व्यवस्थापन व यशस्वी गोशाळा, सेंद्रिय शेतीसाठी गोपालन, पशूपालकांची जबाबदारी, ग्रामीण विकास व गोशाळा या विषयांवर चर्चा करण्यात आली.