कार्यालयामध्ये पदोन्नती मिळण्यासाठी स्वत:च्या १९ वर्षे वयाच्या मुलीला वरिष्ठाबरोबरच संबंध ठेवण्याच्या मागणीसाठी वडिलांनीच मुलीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांकडून करण्यात आलेल्या मागणीला ठाम विरोध करणाऱ्या या मुलीचा लैंगिक छळ करण्याबरोबरच तिला घरात कोंडून मारहाण करून धमक्याही देण्यात आल्या. मात्र, आईच्या मदतीने अखेर या मुलीने पोलिसात तक्रार देत या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी वडिलांसह तिचे आजी-आजोबा व एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागात राहणारा हा आरोपी हडपसर येथील एका केबलच्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो. घरात तो सातत्याने भांडणे करीत असल्याने त्याची पत्नी काही वर्षांपासून त्याच्यापासून वेगळी राहते आहे. कंपनीमध्ये पदोन्नती मिळावी यासाठी वरिष्ठांशी संबंध ठेवण्याची मागणी त्याने काही दिवसांपूर्वी मुलीकडे केली होती. मात्र, मुलीने या प्रकाराला ठामपणे विरोध केला. तिने सातत्याने हा विरोध कायम ठेवला. त्यामुळे या मुलीला वडिलांनी घरात कोंडून ठेवले. शिवीगाळ व मारहाण करून तिचा लैंगिक छळही करण्यात आला. या प्रकारात तिचे आजी-आजोबा व वडिलांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीनेही मदत केली.
अनेक दिवस हा छळ सोसल्यानंतर तिने हिम्मत दाखवून आईची भेट घेतली. त्यानंतर दोघींनी मिळून कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठले व त्या ठिकाणी याबाबत फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक हे करत आहेत.