प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्यात आला आहे. यावरुन राज्यात राजकारण पेटले असून यावर बोलताना खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी भाजपावर निशाणा साधला. अशा प्रकारे निर्णय घेत भाजपा द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आळंदी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
कोल्हे म्हणाले, चित्ररथ नाकारल्याने शंका येण्यासारखी जागा आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांचे चित्ररथ नाकारण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा चित्ररथ लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत. आपल्या राज्याचा चित्ररथ हा प्रजासत्ताक दिनी राजपथावरुन जाणं ही अभिमानाची गोष्ट असायची. मात्र, तो का नाकारण्यात येत आहे, याविषयी खरोखर संभ्रम आहे. यामध्ये द्वेषाचे राजकारण तर नाही ना असा संशय निर्माण होत आहे, असेही कोल्हे यावेळी म्हणाले.
घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यस्थापनात बरीच प्रगती आवश्यक
आळंदी, चाकण, राजगुरू या गावच्या मुख्याधिकाऱ्यांच्यासोबत माझी बैठक झाली आहे. इथल्या विविध कामांचा आढावा मी घेतला असून नगरसेवकांचे आक्षेप, नागरिकांचे प्रश्न यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यस्थापन या दोन्हींविषयी अजून बरीच प्रगती करायची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आळंदीच्या नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट असल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले.