वाघोलीत केसनंद फाटा येथे लाकडाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाकडून हप्ता वसूल करणाऱ्या वनरक्षकावर लाच लुच प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. व्यावसायिकाच्या टेम्पोवर कारवाई करणार नसल्याचे सांगत वनरक्षकाने त्याच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. मागणी केलेली लाच रक्कम स्वीकारताना वनरक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनरक्षक ओमप्रकाश पवार याने लाकडाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाकडे प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधीत व्यावसायिकाने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच लुचपत विभागाने वनरक्षकाला  पकडण्यासाठी सापळा रचला. आज दुपारच्या सुमारास व्यावसायिकाने त्याला वाघोली येथील केसनंद फाटा जवळील चहाच्या टपरीवर पैसे देण्यासाठी बोलवले. यावेळी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.