पुण्यातील कोथरूड परिसरातील किष्किंधानगरमध्ये अज्ञात व्यक्तीने चार दुचाकी जाळल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. किष्किंधानगरमधील रस्त्यावर लावण्यात आलेल्या चार दुचाकींना आग लावून त्या जाळण्यात आल्या. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीने किष्किंधानगरमध्ये शेजारी शेजारी लावण्यात आलेल्या चार दुचाकींना आग लावली. आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना बोलावल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून रात्रीच्यावेळी दुचाकी जाळण्याचे प्रकार पुणे आणि परिसरात सातत्याने सुरू आहेत. रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त सुरू असतानाही समाजकंटकांकडून दुचाकी जाळण्यात येतात. कोथरूड, निगडी, सिंहगड रस्ता या परिसरामध्येच काही महिन्यांपूर्वी अशाच घटना घडल्या होत्या.