पुणे जिल्ह्यातील चाकणमधील महा ई-सेवा केंद्रावर पैसे घेऊन बनावट अधारकार्ड काढून देणारे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शेतकरी कर्जमाफीत आधारकार्डचा घोळ कायम असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा महसूल, प्रांत आणि चाकण पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली.

सध्या शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. चाकण उद्योग नगरीचा विस्तार झपाट्याने होत असताना याठिकाणी राज्यासह परराज्यातून कामाच्या निमित्ताने नागरिक येतात. याचा फायदा घेत आरोपींनी बोगस आधारकार्ड देण्याचा उद्योग सुरु केला होता. महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जातात. मात्र, अशा प्रकारामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.  एकीकडे नागरिक रांगेत उभे राहून आधारकार्ड काढत असताना दुसरीकडे बनावट आधारकार्ड तयार करुन फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे महा ई-सेवा केंद्राबाबत नागरिकांच्या मनात सांशकता निर्माण झाली आहे.