पुणे : सांभाळ करणे अवघड झाल्याने आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीची भीक मागण्यासाठी दाेन हजार रुपयांना विक्री केल्याचा आणि यामध्ये त्यांना जात पंचायतीच्या पंचानी साथ दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरीआई देववाले समाजातील दहा पंचांसह पीडित मुलीच्या आई-वडिलांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> चिंचवड येथील मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा शनिवारपासून

या प्रकरणी ॲड. शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. हडपसर) यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुलीची आई नीलाबाई अनिल पवार, वडील अनिल हिरा पवार (रा. मिराजगाव, ता. कर्जत, जि. नगर) यांच्यासह जात पंचायतीचे पंच अनिल जाधव, लक्ष्मी अनिल जाधव, लक्ष्मण भगवान निंबाळकर, अण्णा बाळू पवार, रामा निंबाळकर, नारायण पवार, बाळू पवार, माऱ्या पवार, पंडया पवार, अण्णा निंबाळकर, शेटण्णा पवार, सोनिया पवार आणि ढेऱ्या पवार यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकील असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना याबाबतची कल्पना दिलेली हाेती. एक महिला मागील दोन महिन्यांपासून कल्याणीनगर, विमाननगर परिसरात चार ते पाच वर्षाच्या एका मुलीला घेऊन भीक मागत असताना दिसून येत हाेती. पुरेशी भीक न मिळाल्यास ही महिला मुलीला मारहाण करत होती. त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेतली असता, नगरमधील एका दाम्पत्याला सहा मुली असून त्यांच्याकडून पुण्यातील दाम्पत्याने समाजातील पंचाच्या सहमतीने दाेन हजार रुपयांना विकत घेतले असल्याची बाब उघडकीस आली.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलीला विकत घेण्यासाठी जात पंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली. समाजातील चारजणांनी त्या मुलीला विकत घेऊ नये यासाठी विरोध केला. परंतु समाजातील दहा पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तसेच या प्रकारला मान्यता दिली, विरोध करणाऱ्यांना जातीचे बाहेर काढून त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल असा दम जात पंचायतीने दिला. त्यामुळे याबाबतची माहिती मिळाल्यावर लोखंडे यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पाेलिसांनी अनिल जाधव आणि लक्ष्मण जाधव या दोन जणांना अटक केली आहे.